Type Here to Get Search Results !

उंब्रज पोलिसांनी अवैध व्यावसायिकांवर 'धुळवड'


 उंब्रज प्रतिनिधी / गौरव खवळे

उंब्रज पोलीसांनी अवैध व्यावसायिकांवर 'धुळवड'


उंब्रज पोलीस पथकाची अवैध धंद्यावर मॅरेथॉन छापेमारी;


तेरा संशयित ताब्यात; एक लाख चौसष्ट हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त 



होळीसह धुळवड साजरी होत असतानाच दुसरीकडे उंब्रज पोलिसांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारत धुळवड साजरी केली. पाटण तालुक्यातील कोंजवडे, कराड तालुक्यातील वडगाव पश्चिम यासह उंब्रज परिसरात पाच ठिकाणी छापेमारी करत जुगार अड्ड्यांसह बेकायदा दारूअड्डे उध्वस्त केले. १३ संशयितांना ताब्यात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने अवैध व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंब्रज पोलिसांनी सातत्याने अवैध व्यावसायिकांवर कारवाईची मोहिम सुरू ठेवली आहे. दरम्यान सध्या होळी, धुळवडीसह रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. दुसरीकडे अवैध व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्रीसह जुगार अड्ड्यांचा बाजार मांडला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने चार पथके तयार करत कारवाईचा धडाका सुरू केला. अवैध व्यावसायिकांना अजिबात काणकुण न लागता छापेमारी केली. पाटण तालुक्यातील कोंजवडे येथे देशी दारूचा साठा जप्त करत एकास ताब्यात घेतले. कराड तालुक्यातील वडगांव पश्चिम येथेही छापा टाकून देशीदारूच्या बाटल्याचा साठा हस्तगत करत विक्री करणाऱ्यास पकडले. हरपळवाडी, गुगलमळा या ठिकाणी तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथेही छापा टाकून ५ संशयितांसह तब्बल १ लाख ९ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. स्वतः रविंद्र भोरे यांनी या कारवाईतील संशयितांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. ही कारवाई सुरू असतानाच भोरे यांना हरपळवाडीतच गावी मळा नावाच्या शिवारात तीन पानी जुगाअड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथेही तातडीने छापा टाकून अन्य ५ जणांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५३ हजार ११० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पेरले येथे मारूती मंदीराच्या आडोशाला एक संशयित देशीदारू विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला दारूसाठ्यासह ताब्यात घेतले. एकापाठोपाठ एक अशा सलग पाच कारवायांचा सपाटा लावत उंब्रज पोलिसांनी धुळवड साजरी केल्याची चर्चा परिसरात होती.


सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे म्हणाले, अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. नागरिकांनी अवैध व्यावसायिकांची दहशत सहन न करता पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवून कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments