Type Here to Get Search Results !

चिंचणेर निंब मधील महीला बचत गट करणार गांडूळ खत निर्मिती



 *चिंचणेर निंब मधील महिला बचत गट करणार गांडूळ खत निर्मिती*

 

देशमुखनगर (सतिश जाधव) : कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव,  सातारा व महाराष्ट्र शासन कृषी विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे दत्तक गाव चिंचणेर निंब येथे महिला बचत गटासाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून स्वच्छता कृती आराखडा अंतर्गत प्रत्येक गटाला एक असे गांडूळ खत निर्मितीसाठी मोफत बेड वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. चिंचनेर निंब गावात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करत असून गटाच्या मार्फत गांडूळ खत निर्मिती करून विक्री करावी असे कृषी सहाय्यक श्री. धनाजी फडतरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. गटातील महिलांनी एकत्र येऊन सेंद्रिय निविष्ठा उदा. गांडूळ खत, दशपर्णी अर्क,वर्मी वॉश, जीवामृत याची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून विक्री करावी व त्यासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा कायम तत्पर असेल असे आश्वासन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश बाबर यांनी दिले. सदर कार्यक्रमाच्या वेळी श्री संग्राम पाटील, कार्यक्रम सहाय्यक यांनी प्रत्यक्ष पद्धतीने जीवामृत तयार करणे तसेच गांडूळ खताचे बेड भरणे याचे प्रात्यक्षिक महिलांना करून दाखवले. पिक उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका महत्त्वाचा घटक असून महिला वर्ग सहज करू शकणारा, चांगला शेतीपूर्वक जोडधंदा असून जास्तीत जास्त महिलांनी त्याकडे वळावे असे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. स्वाती गुरवे यांनी महिलांना सांगितले. हळदी कुंकू, वाण वाटप व विविध उखाण्याच्या गजरामुळे सदर प्रशिक्षणाला चांगलीच रंगत आली. प्रत्येक महिलेला वाणाच्या स्वरूपात एक-एक लिंबाचे झाड देऊन 'झाडे लावा-झाडे जगवा' असा निसर्गाचा समतोल साधणारा मोलाचा संदेश कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव कडून महिलांना देण्यात आला. सदर प्रशिक्षण केवीके बोरगावचे शास्त्रज्ञ श्री भूषण यादगिरवार, श्री सागर सकटे, डॉ. कल्याण बाबर व कार्यक्रम सहाय्यक सौं. शितल काकडे (भोसले) यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमांस उमेद चे श्री.अमोल पांढरपट्टे,यांनी उमेद राबवीत असलेल्या बाबींचा उहापोह केला. उमेद च्या तालुका  समन्वयक सौ.सुचित्रा गायकवाड  यांनी सर्वांचे आभार माणून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments