गुन्हेगारीची वाढली धग
तडीपार 'सारख्या प्रभावी कारवाईचा उताराही गुन्हेगारांवर चालेना
देशमुखनगर(सतिश जाधव) : सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागठाणे आणि परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह अन्य टोळ्यांचे कारनामे वाढू लागले आहेत. बऱ्याच कारनाम्यांची मालिकाच सुरू आहे. तडीपार सारख्या प्रभावी कारवाईचा उतारा कमी झाल्याचे चित्र आहे. खंडणी , दहशत, हाणामारी, अवैध धंदे यामधून साम्राज्य निर्माण करू पाहणाऱ्यांमुळे परिसरात गुन्हेगारीची धग वाढली आहे.
गुन्ह्यांची मालिका आणि दहशत जनतेनी अनुभवला आहे. यापूर्वी गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांकडून तडीपार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. यातून कितीतरी गुन्हेगारांना कारागृहाची हवा खावी लागली. काही गावे जणू गुन्हेगारांचे माहेरघरच बनले होते. मात्र तडीपार कारवाईच्या धडाक्यामुळे काही वर्षांत संघटित गुन्हेगारीला काहीसा चाप लागला. गुन्हेगारी साम्राज्य असलेल्या भागांमध्ये शांतता दिसून येत होती. मात्र गुन्ह्यांचा कमी झालेला आलेख गेल्या दोन वर्षांत पुन्हा वाढत आहे.
पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, अत्याचार, फसवणूक, घरफोड्या, खंडणी, वर्चस्वासाठी दहशत निर्माण करण्याच्या घटना वाढत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या कारनाम्यांमुळे गुन्ह्यांमध्ये भर पडत आहे. यामुळे शांततेला पुन्हा गालबोट लागत आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पुन्हा टोळ्या निर्माण करण्यात येत आहेत. यामुळे टोळ्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. भागाभागात वर्चस्व ठेवण्यासाठी धुसफूस वाढत आहे. वाढत्या गुन्ह्यांमुळे भागातील नागरिक त्रस्त होत असताना दिसून येते आहे.
नवीन कायद्याच्या चौकटीत कारवाई करताना पोलिसांना काहीशा मर्यादा येत असल्याची चर्चा आहे. यामुळे गुन्हेगारांचे मात्र चांगलेच फावत चालले आहे. पोलिसांकडून कारवाईसह दहशत मोडून काढण्यासाठी भागात तपासासाठी फिरवण्याचे कामही करण्यात येत असले तरी त्याची मात्रा लागू पडत नसल्याचे दिसून येत आहे. अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालताना त्यांच्याशी संलग्नित गुन्हेगारांची पाठराखणही शांततेला बाधा आणत आहे. नव्या टोळ्या गुन्हेगारीत उतरू पाहात असून फाळकुट दादांची पील्लावळी वाढत चालली आहे. गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण करण्यासाठी रस्त्यावर उतरून खाकीची दहशत निर्माण करण्याची गरज आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारपेठे बरोबर लहान मोठ्या उद्योगांमुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले. मात्र याच उद्योगांच्या माध्यमातून ईझी मनी कोणत्या प्रकारे मिळेल आणि आपलीच हवा कशी राहील यासाठी गुन्हेगार, नेतेगिरी करणारे प्रयत्नशील आहेत. तसेच अन्य मार्गातून वचक निर्माण करण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. यातून उद्योगांवरील खंडणीचे साम्राज्यही वाढले आहे.
बोरगाव येथील बेकरीचा व्यवसाय करणाऱ्या विकास कोळेकर यांना कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी उकळली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. अशाप्रकारे दहशत माजवून खंडणी वसूल करण्याचे प्रकरणे होत असतील तर उद्योग आणि व्यापार, व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न जनते समोर निर्माण होत आहे.

Post a Comment
0 Comments