शेणोलीच्या संजीवनी विद्यामंदिराच्या जीर्णोद्धारासाठी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ एकवटले
— शाळेचा कायापालट करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नव्या पर्वाची सुरुवात..
शेणोली (ता. कराड) – येथील संजीवनी शिक्षण संस्था संचलित संजीवनी विद्यामंदिर शाळा हे गावातील एक जुने, प्रतिष्ठित आणि अनेक यशस्वी विद्यार्थी घडवणारे शैक्षणिक केंद्र आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बदलत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे शाळेच्या भौतिक व शैक्षणिक स्थितीत घसरण झाली होती. आता या शाळेचा जीर्णोद्धार करण्यासाठी गावकरी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे पुढे सरसावले आहेत.
१९६६ च्या सुमारास शेणोली,शेरे,सोनकीरे,पाडळी,नेर्ले,कापील गोळेश्वर आणि परिसरातील शिक्षणप्रेमी आणि समाजभिमुख नागरिकांनी मिळून संजीवनी शिक्षण संस्था स्थापन केली. त्यामध्ये संजीवनी विद्यामंदिर शाळेचा जन्म झाला. ही शाळा म्हणजे गावाच्या प्रगतीचा पाया ठरली. आजवर या शाळेतून हजारो विद्यार्थी घडले असून अनेकांनी शासकीय सेवेत, विविध व्यवसायांमध्ये, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. अनेक माजी विद्यार्थी आज देश-विदेशात आपल्या कार्याने गावाचे नाव उज्ज्वल करत आहेत.
सहविचार सभेतून प्रेरणा आणि कृतीची दिशा अलीकडेच शेणोली ग्रामपंचायतीमध्ये शाळेच्या जीर्णोद्धारासाठी एक सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेस गावातील शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शाळेच्या डागडुगीपासून ते आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण साहित्य, मुलांसाठी खेळाचे साहित्य, शाळेचे गेट आणि परिसराचे सौंदर्यीकरण आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी आपला एक महिना पगार शाळेसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या समर्पणाला माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. काहींनी बांधकाम साहित्य, संगणक उपकरणे किंवा कामासाठी श्रमदान करण्याची तयारी दर्शवली आहे.
“संजीवनी विद्यामंदिर जीर्णोद्धार” या नावाने या उपक्रमाला सुरुवात झाली असून हे फक्त भिंतींचे नव्हे तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नव्याने पुनर्निर्माण आहे. ही मोहीम सामाजिक एकतेचा आणि शिक्षणासाठीच्या समर्पणाचा सुंदर नमुना ठरत आहे.
या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे शाळेची इमारत, वर्गखोल्या, टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचे दुरुस्ती काम आणि आवश्यक नवीन सुविधा उभारणे आहे. पुढील टप्प्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आधुनिक शिक्षण साधनसामग्री, शिक्षक प्रशिक्षण, आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी विशेष वर्ग आयोजित केले जाणार आहेत.
गावातील सर्वच घटकांचा सहभाग, शिक्षकांचे समर्पण, माजी विद्यार्थ्यांचे योगदान हे या उपक्रमाचे खरे यश आहेत. ही शाळा पुन्हा एकदा गुणवत्तेची, संस्कारांची आणि यशाची पायरी बनवण्यासाठी शेणोलीकर एकजुटीने प्रयत्नशील आहेत.
Post a Comment
0 Comments