जिल्हा परिषद शाळा – आशेचा किरण!
देशमुखनगर : प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे शिक्षणाचा ठसा असतो, आणि त्या शिक्षणाची पायाभरणी जिथे होते ती शाळा म्हणजे त्या यशाचं पहिलं पाऊल. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे सातारा तालुक्यातील जावळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची – जी अनेकांसाठी फक्त शाळा नसून एक आशेचा किरण बनली आहे.
कुलदीपसिंह विनायकराव काटकर सध्या युनायटेड अरेबिक एमिरेट्स (UAE) येथे एक नामवंत ऑईल अँड गॅस कंपनीमध्ये सीनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे बंधू चि. अभिषेक विनायकराव काटकर सध्या पुणे येथे एका खाजगी कृषी तंत्रज्ञान कंपनीमध्ये प्रकल्प अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या दोघा भावांनीही आपल्या शालेय जीवनाची सुरुवात एका सामान्य जिल्हा परिषद शाळेमधून – म्हणजेच गावातील शाळेमधून – केली.
प्रथम ते चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी याच जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पुढे शिक्षणासाठी त्यांनी मोठ्या शहरांचा रुख केला आणि कठोर मेहनत, चिकाटी, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेले हे बंधू आज केवळ स्वतःच यशस्वी नाहीत, तर त्यांनी आपल्या मूळ शाळेच्या विकासासाठी योगदान द्यायचा संकल्प केला आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्लिश मीडियम व प्रायव्हेट शाळांचा बोलबाला आहे. मात्र, हे दोघे बंधू ज्या जिल्हा परिषद शाळेतून शिकले, तिथल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांचा प्रवास दाखवतो की गुणवत्ता, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जिल्हा परिषद शाळेतून शिकलेली मुलेही आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकू शकतात.
शाळा म्हणजे केवळ इमारत नव्हे, ती असते संस्कारांची शिदोरी देणारी जागा. आणि अशीच शाळा – जिल्हा परिषद शाळा – आज आपल्या माजी विद्यार्थ्यांमुळे नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे.

Post a Comment
0 Comments